अन्यायाविरुद्ध कसून लढाणाऱ्या तरुणाईला सलाम (एका तरुण मित्र मैत्रीणीस समर्पित )
किमान आपल्या देशातील तरी तरुणांचा आवाज ऐकायला मिळतो तो एकतर महात्मांची जयंती किंवा धार्मिक समारंभात. तसा तरुणांनी माणुसकी हा धर्म समजून अन्यायाविरोधात कसून लढाई दिली असे अनुभव फार कमीच ऐकिवात येतात. म्हणून आज आवर्जून अशा दोन तरुणांविषयी व ज्यांनी माणुसकी हा धर्म समजून एका निराश्रित मुलीला सुरक्षित निवारा मिळून दिला, ज्यांच्याशी माझाही संपर्क मागच्या काही दिवसांपूर्वीच आला त्याविषयी लिहावेसे वाटले.
मला काही दिवसांपूर्वी एक फोन आला. एक मराठी आणि एका हिंदी भाषिक असा एक मुलगा व मुलगी मदत मागण्याच्या स्वरात माझ्याशी त्यांनी बोलायला सुरुवात केली. ताई माझ्या मैत्रिणीला तुम्हाला काही सांगायचे आहे असा तो तरुण म्हणाला. नंतर एक हिंदीभाषिक मुलगी बोलायला लागली. “दीदी मेरे घरके सामने बारिशमे एक लाडकी कूछ दिनोन्से अकेली बैठी है ! सामने एक शराब का अड्डा भी है ! मेने खाना देणेके बहानेसे बात कि तो उसने बताया. "मी परभणीची आहे, माझ्या नवऱ्यानं मी सुंदर दिसत नाही म्हणून दुसरं लग्न केलं . आम्ही ६ बहिनी आहोत. माझ्या बापानं मला गाडीत घालून इथं आणून सोडलं. मला लई मारत्यात. मी सगळं तिच्या तोंडून ऐकत होते. माझ्यातली कार्यकर्ती जागी झाली आणि झटक्यात तिला जाऊन भेटावं असं वाटलं. पण परिस्तितीची जाणीव झाली आणि आता दमाने काम घ्यावे लागेल असे वाटले. मी तिला म्हटलं अशा केसेस मध्ये आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल.
केवढं आत्मविश्वासाने मी तिला पोलिसांचे नाव सुचवलं. ती हो म्हटली आणि मी पण निवांत झाले. कारण पोलिसांची मदत म्हणजे समूळ प्रश्नाचे उच्चाटन असेच मला नेहमी वाटते. २ दिवसांनी मला पुन्हा त्या मुलीचा फोन आला. यावेळी ती खूपच वैतागलेली होती. म्हटली " दीदी मेने आपने बोला वैसे women help line को फोन किया. पुलिस आयी और उसे ले गई ! मुझे लगा कि किसी संस्थामे छोडा होगा, लेकिन आज वही लाडकी मुझे हिंजेवाडीके खुले मैदानमे पडी हुई दिखाई दि! कमसेकम हमारे यहा कुछ दुकांनोका आसरा लेकर तो वो बैठती थी लेकिन अबतो वो खुले मैदानमे बारिशमे अकेली है !
मी जे ऐकते आहे त्यावर माझाही विश्वासच बसत नव्हता. जेवढ्या विश्वासानं मी तिला पोलिसांची मदत घे असं सांगितलं तेवढं मला खूप मोठी चुकी केली असं वाटलं. त्यावर तिने मला अजून एक शॉकिंग माहिती सांगितली. ज्या ठिकाणी तिने मदत मागण्यासाठी फोन केला होता त्या women help line ला तिने पुन्हा चौकशी साठी फोन केला तेव्हा तिथले सल्लागार एकमेकांना हिला आता काय सांगायचं? , हीचा त्या वेड्या मुलींसाठी फोन आहे अशी कुजबुजणारी चर्चा करू लागले. खरतर ती मुलगी वेडी का शहाणी असं काहीच तिने फोन वर सांगितलं नव्हतं. महिलांना मदत करण्याऱ्या या हेल्प लाईन विषयी मी जेवढ्या विश्वासाने लोकांना खास करून महिलांना माहिती देते ती आता द्यावी कि नाही असा क्षणभर प्रश्न माझ्या मनात आला.
म्हणून आता आपण स्वतःच तिच्यासाठी सुरक्षित निवारा शोधायचा यासाठी माझी शोधाशोध सुरु झाली. रात्री ११ च्या सुमारास मी सामाजिक संस्थांच्या ग्रुप वर मेसेज टाकला. त्यांना हकीकत सांगितली. रात्री पटापट मला काही messages , कॉल आले. आम्ही परभणीत आहोत माहिती सांग, पत्ता शोधायला मदत करतो. अनेकांनी "माहेर" महिलांसाठी निवासी संस्था चे नाव सुचविले. मला खूप विश्वस्त झाल्यासारखे वाटले.
ती रात्र खूप कठीण वाटली. एरवी हजारो लाखो महिला रस्त्यावर असतातच पण आपल्या पर्यंत विषय आला आणि आज इतक्या पावसात ती मुलगी आडरानात एकटी आहे. तीला काय वाटत असेल. किती भेदरलेली असेल ती. तिच्यावर काही अतिप्रसंग तर होणार नाही ना अशा हजार प्रश्नांनी मी कशीतरी ती रात्र काढली.
सकाळी लवकरच माहेर संस्थेच्या एका ताई ला फोन केला. ती म्हटली ४ दिवसांनी सोय होऊ शकते. जागा कमी आहे. quaratntine करावे लागेलं तिला. पण लागेलच विषयाचे गांभीर्य समजून त्यांनी आज तिला घेऊन या मात्र येताना पोलिसांचे लेटर आणा असे सांगितले. मला खूप आनंद झाला. अशा कठीण स्तितीत माहेर संस्थेने दिलेले आश्वसन माझ्यासाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा अनमोल होते.
मी सुटकेचा श्वास घेतला आणि आणि माझ्या त्या दोन तरुण मित्र मैत्रिणीला फोन केला. काम झाले असे म्हटल्यावर त्यानादेखील आकाश ठेंगणे झाले. जाताना फक्त पोलिसांचे लेटर घेऊन जा असे मी सांगितले. तो बिचारा रात्रपाळी करून आला होता. मला म्हणाला ताई मला ५ बहिणी आहेत, मी मुलींचे दुःख समजू शकतो. मी जातो काही हरकत नाही. आणि इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. आम्हाला काय माहित होते कि पोलिसांचे एक लेटर मिळविणे म्हणजे चंद्रावर जाऊन येण्याइतपत अवघड असेल ते . पोलीस स्टेशन च्या बाहेरून माझ्या मित्राने मला फोन केला, " ताई मी आलो आहे, पण माझीसुद्धा पोलीस स्टेशन ला जाण्याची हि पहिलीच वेळ आहे मला खूप घाबरल्यासारखं होतंय. खरतर मला खुप वाईट वाटले पण मी त्याला सांगितलं कि काही नाही होणार तू जाऊन सर्व सांग पोलिसांना.
कोणत्याही स्थितीची जाणीव नसताना माझा तरुण मित्र पोलीस स्टेशन ला गेला. पोलिसांनी बाहेरूनच विचारले काय काम आहे. त्याने सर्व हकीकत सांगितली. पोलीस म्हटले मग आम्ही काय करू. पहिले तुम्ही तिला दवाखान्यात न्या तिचे वय काय काढून आणा. तो बिचारा तरुण मुलगा, सर मी कसं जाऊ, ती माझ्या ओळखीची नाही काहीतरी गैरसमज होईल तुम्ही या ना सोबत. तसं त्या पोलिसच डोकं सटकलं म्हटलं मला कोरोना झाला आहे मी नाही येउ शकत.
यात संध्याकाळ झाली, आमचा जीव खालीवर होत होता. आज काहीही करून तिला सुरक्षित ठिकाणी हलवायचा हा आमचा निर्धार आम्हाला कायद्याच्या बंधनात कोलमडून पडल्यासारखा वाटत होता. पण आम्ही जिद्द सोडायची नाही असे ठरविले. मी गुगल शोधले "भरोसा सेल " महिलांसाठी मदत होऊ शकते असे ऐकले होते. चला हवा येऊ द्या मध्ये कार्यक्रम बघताना खूप हायसे वाटले कि आता आपण इथे मदत मागू शकतो. आपल्या हक्काचे भरोसा . मी १०९० ला फोन लावला, खूप केविलवाण्या आवाजात सर्व हकीकत सांगितली, समोरून पत्ता सांग असे म्हटले. लोकेशन पाठवते असे म्हटले तर नको लिहून दे असे सांगितले. मी म्हटले ठीक आहे मी परत फोन करते असे म्हणून पुन्हा फोन केला तर फोन कुणीतरी दुसऱ्यानेच फोन घेतला. मग पुन्हा सर्व सांगितले. ते म्हटले मार्शल पाठवतो. मला पुन्हा चिंता पुरुष असतील तर, त्या मुलीला एवढ्या रात्री कुठे नेतील ती घाबरेल , मग काय होणार असे हजार प्रश्न मनात येऊ लागले. पण आता मागे हटता येणार नव्हतं. आम्ही पुढे जायचे ठरविले. थोड्यावेळातच मार्शलचा फोन आला. बाई तुम्ही केला का फोन जरा लवकर का नाही केला . मी आत्ताच इथून गस्त घालून गेलो कोणी नाही. हे बघा मी इथे पहिले तिथे पहिले. ती कुठेच भेटली नाही. मी म्हटलं ठीक आहे सर , सकाळी बघतो. लगेच दुसरा फोने पोलिसांचा . आम्ही जाऊन आलो आता तुमची काही तक्रार तर नाही ना. मी नाही म्हटलं. त्यांचे आभार पण मानले. त्यांनी मला उद्या भेटली कि कॉल करा असे सांगितले. एक नंबर पण दिला. खूप हायसे वाटले. चला किमान उद्या होईल तिचे काम. पण आजची रात्र जास्तच त्रासदायक वाटली. दिवसभर घरात नीट स्वयंपाक नाही कि खाणं नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी, रविवार भरोसा सेल बंद असते. हा नियम का केला असेल बरं. लोक काय सुटीच्या दिवशी हिंसा करत नसतील काय? का सुट्टी च्या दिवशी उलट अशा तमाशाना उधाण येतं . आम्ही सगळीकडे पाहतो बायका मीटिंग मध्ये सांगतात ताई नको ती सुट्टी . किमान इतर दिवशी दुपारचा वेळ तरी सुखाचा असतो पण सुट्टीच्या दिवशी दारू, भांडण, खाणं पिणं असे काय काय विचारू नका.
मी पुन्हा दिलेल्या नम्बर वर फोन केला. पुन्हा दुसरी व्यक्ती, पुन्हा सगळी माहिती सांगितली, त्यानी तर बाउन्सररच टाकला. तुम्ही कुठे फोन केलाय. मी म्हटलं माहित नाही का काल इथेच केला होता. मला मदतीचे promise पण मिळाले होते मला तुम्हीच मदत करा, त्यांनी अजून एक नंबर दिला . मी पुन्हा फोन केला त्या सरांना सर्व हकीकत सांगितली. ते बघतो म्हटले. पण आम्ही नाही येणार, स्थानिक पोलीस स्टेशन ला जा. म्हणजे तिथेच जिथल्या पोलिसाला corona झाला होतो पण तो कामावर हजर होता. किती मूर्ख समजतात लोकांना, सामान्य माणूस यांच्या विरोधात काहीच बोलू शकत नाही असे नाही पण धजावत नाही म्हणून काहीही सांगायचे. पण गरजवंताला अक्कल नसते तसे माझा मित्र पुन्हा तिथेच गेला मदत मागायला.
मोठ्या सरानी सर्व हकीकत ऐकून घेतली बरेच प्रश्न विचारले त्याला २ तास लागले. सर्व हकीकत लिहून घेतली एक लेटर तयार केले. तुमची गाडी आणा आणि घेऊन जा असे सांगितले. आमच्यकडे गाडी नव्हती. आम्ही ambulanceची चौकशी करून ठेवली होती पण corona रिपोर्ट असल्याशिवाय हात लावनार नाही असे त्यांनी सांगितले. आम्ही हतबल झालो, विनंती केल्यावर एका पोलिसांच्या सांगलीतले मी माझी गाडी घेतो पण पेट्रोल ला पैसे द्यावे लागतील. आता पोलिसांच्या गाडीला मदत करणार्यांनीच पैसे द्यायचे म्हणजे. आता सगळ्यांना सगळ्यांची स्थिती माहित आहे. मग घासाघीस सुरु झाली. मग पोलिसांनी ambulance बोलावली ३००० रु द्या म्हटले. पैसे आहेत कोणाकडे. जर आम्ही पैसेवाले असतो तर एवढ्या २,४ दिवसं असं वेड्यासारखा पोलिसांना मदत मागावी लागली असती का? असा प्रश्न सुद्धा मनात येऊन गेला. शेवटी १५०० रु वर ठरले. तोपर्यंत एका पोलिसांने मला फोन केला . म्हटला तुम्ही तक्रार केली का ? अहो या बाई ला तर आम्ही बऱ्याच दिवसापासून इथेच बघतो आहोत. मला शॉक लागला . मग बघताय तर कुणाची वाट पाहताय. तिच्या मर्डर ची का रेप ची. इतकं डोकं सटकलं कि विचारता सोय नाही . पण पुन्हा गरजवंताला अक्कल नसते तसे मी गप्प बसले. माझा मित्र पोलिसांच्या गाडीत बसला सोबत एक कॉस्टेबल पुरुष व महिला. संपूर्ण २,३ तासाच्या प्रवासात त्यांनी माझ्या मित्राला इतके tochar केले कि कुणीही शहाणा पुन्हा कोणालाही मदत करायला जाणार नाही. अशा बाईला मदत करतात का? कुणी दुसरी असती तर ठीक होतं . हि अजून काही दिवस उघड्यावर राहिली असती तरी काय फरक पडला असता?. अशा लोकांना चांगलीच अद्दल घडविली पाहिजे. अशा हजार गोष्टीत ज्यातून खरंच माणुसकीवरचा विश्वास काही केल्या बसू शकतच नाही. माझा मित्र हे सर्व गपगार बसून एकूण घेत होता कारण त्याला त्या मुलीला सुरक्षित ठिकाणी पोहचवायचं होतं जेकी फक्त पोलिसिच करू शकत होते. कसेबरे संस्थेत पोहचल्यावर हि इथे टिकणार नाही , पळून जाईल. तिला काही झाले तर तुमचेच नाव येईल अशा नाना तर्हेने त्याला तू कशी चूक केली आहेस हे ते पोलीस सांगत होते. पुढचा कहर म्हणजे तिला सोडल्यावर त्या मुलाला देखील पोलीस गाडीत बसवायला तयार नव्हते. रात्र झाली होती. रस्त्यावर कोणी नाही, अशा स्तिथीत तू जा कसा जायचं तसा असं म्हणून त्यांनी त्यांचे या प्रकरणातून हात झटकले. त्याने बऱ्याचवेळा विनंती केल्यावर मधेच कुठेतरी त्याला त्यानी सोडून दिले व तो कसाबसा बिचारा घरी आला.
अशा पद्धतीने न आवाज येणाऱ्या बुक्यांचा मार खाऊन तरीही न मागे फिरत या तरुण मुलांनी त्या मुलीला सुरक्षित जागी निवारा मिळून दिला. या तरुणाच्या जागी जर दुसरे कोणी असते तर कानाला खडा लावला असता. एकतर त्या मुलीला मदत देण्याचा नाद सोडला असता किंवा पुन्हा असं कोणाला मदत करायला जायचे नाही असे ठामपणे ठरविले असते. पण तसं काहीही न करता कसून प्रयत्न करून आलेल्या सर्व संकटाना सामोरे जाऊन यांनी आपले ध्येय गाठले अशा तरुणाईला माझा सलाम.
आम्ही हे समजू शकतो कि कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपल्या जीवाला जपतो आहे. पण आपण हतबल आहोत हे सांगणे वेगळे व या जागी दुसरी कोणी असती जी जरा बऱ्या कुटुंबातुन आहे तिला मदत केली तर corona ची भीती नव्हती का? खरचं हेच कारण असेल काय कि तिला सुरुवातीलाच एका सुरक्षित ठिकाणी सोडवायच्या ऐवजी माळरानात पोलिसांनी सोडली. टीव्हीवर एखाद्या मोठ्या अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली तरी बऱ्या बोलाने त्याच्या दिमतीला पोलीस काय आणि डॉक्टर काय सर्वच सरसावतात. ते करू नये असे मी म्हणत नाही पण, गरीबाचा , अनाथांचा जीव इतका स्वस्त का ? असाच प्रश्न मला वेळोवेळी पडतो.
या संपूर्ण प्रक्रियेतून मला मिळालेला धडा. सरकारी यंत्रणा मग ती कोणतीही असो आपल्या मदतीसाठी असते ते जर काम करत नसतील तर त्यांच्याकडून ते करवूनच घेतले पाहिजे. जाऊदे म्हणायचे नाही त्याविरोधात आपल्या ताकदीनुसार आवाज उठवायचा. म्हणून माझ्या परीने हा छोटासा प्रयत्न.